शेवटी तर आपणच दोघं असु

जरी भांडलो, रागाराग केला,
एकमेकांवर तुटून पडलो,
एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जे बोलायचं ते बोल,
जे करायचं ते कर,
एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

मी रूसलो तर तु मला मनव,
तु रुसलीस तर मी तुला मनवीन,
एकमेकांचे लाड करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा नजर कमी होईल,
स्मरणशक्ती पण कमी होईल,
तेव्हा एकमेकांना,
एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

गुडघेदुखी जेव्हा वाढेल,
कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,
तेव्हा एकमेकांच्या,
पायाची नख कापण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

“माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,
I am Alright”,
असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा आपली साथ सुटेल,
अंतिम निरोपाची वेळ येईल,
तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु,

शेवटी तर फक्त आपणच दोघं असु

Leave a Reply