वेलप्रभू महाराजांचा गर्व हरण

पिठापुरम नगरीत “वेलप्रभू” नावाचे महाराज राज्य करीत होते. एकदा त्याना श्रीपाद प्रभुना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास श्रीअप्पलराज शर्मा यांचे घरी पाठविले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभाना तत्काळ राजदरबारी घेऊन यावे. सेवकांनी महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत बसलेल्या बापन्नाचार्युलू यांना सांगीतला. श्रीपाद प्रभुनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले “आजोबा| राजांच्या मनात भक्तीभाव नाही. तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण महाराज आहोत, आपली सत्ता चोहीकडे चालते. आपण म्हणू तसे झाले पाहिजे. परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही. हे तो राजा जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही.” श्रीपाद प्रभूराजाच्या सेवकाकडे पाहून म्हणाले “तुमचे महाराज केवळ पिठापुरमचे राजा आहेत, परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमचे घरी यावे.येताना, गुरुदक्षिणाआणि महाराजाना शोभेल असा नजराणा घेवून यावे.”प्रभूंचे वक्तव्यऐकूनबापन्नाचार्युलूआणि अप्पल राज शर्मा यांनी आपसात विचार विनिमय करूनयोग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले. सेवकांनी प्रभूंचा निरोप महाराजानासांगीतला. तो ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले “मी या नगरीचा राजा आहे. माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पहातो.”एवढे वाक्य बोलताच ते भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले. सारे सेवक सिंहासना जवळ धावतच गेले आणि त्यांनी महाराजाना उठवून बसविले. त्यांना पाणी पाजवून सावध केले. परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्याना भयंकर वेदना होऊ लागल्या. राजपुरोहीताना बोलावण्यात आले. त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून, आपल्या घरी जाऊन श्रीदत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थ, प्रसाद महाराजाना आणून दिला. महाराज म्हणाले “श्रीपाद वल्लभानी कांही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. आपण यावर कांही उपाय सुचवावा.” राजपुरोहित म्हणाले “महाराज आपण विव्दानब्राम्हणाकडून श्रीदत्तपुराणाचे पारायण करवूनघेवून त्यांना भूदान, अन्नदान आणि सुवर्णदान करावे. तसेच कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभूश्री दत्तात्रेयांची आराधना करावी. राजपुरोहीताच्या सांगण्याप्रमाणे श्रीदत्तपुराणाच्या पारायणास प्रारंभ झाला. परंतु आश्चर्य असे की पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्याला आळा घालणे राजास अति कठीण झाले. राजे महाराजांच्या स्वप्नात त्यांचेपितर येऊन म्हणू लागले “ अरे वेलू, आम्हास श्राद्धभोजन देत नाहीस, आमची या प्रेतयोनीतून सुटका करण्यास कांही करीत नाहीस.” महाराज त्या पितराना म्हणाले “तात, मी शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना?” पितर म्हणाले “आम्हाला कांहीच मिळत नाही. ब्राम्हण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने आणि ब्राम्हणांनी श्रद्धापूर्ण अंत:करणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल.” पितरांचे हे वक्तव्य ऐकून महाराजाना रात्री निद्रा लागली नाही. याच वेळी महाराजांची कन्या भूत-बाधेने पिडीत होऊन, केस मोकळे सोडून. घरातील भांडी फेकून देऊ लागली. ती जेवणाकरिता बसताच, तिला अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे. तिच्या कपड्यांना एका-एकी आग लागे आणि तिचे अंग भाजले जाई.अशा प्रकारे महाराजाना चोही बाजूंनी संकटांनी घेरले होते. महाराजाना सहाय् करणाऱ्या राजपुरोहिताची शांत, सोज्वळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या शिरावर भांडे आपटू लागली. पारायण करणारे ब्राम्हण पारायण संपवून घरी जाताच त्यांना घरात धुमाकूळ घालणारी भुते, प्रेते दिसू लागत. ती पाहून ते बिचारे ब्राम्हण घाबरून जात. ती भुते ब्राम्हणांना म्हणत “तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पती देवापासून दूर करून अतोनात छळ केला. तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाम मार्गाने मिळविलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत.” वेलप्रभू महाराजाना आपल्या करणीचा पश्चाताप झाला.ते स्वत: राजपुरोहित आणि अन्य ब्राम्हणासह श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले. त्या सर्वानी प्रभूंच्या शरणागतीची आर्त स्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धा भावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. क्षमाशील आणि दयाघन श्रीपाद प्रभुनी मोठ्या उदार अंत:कारणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले “मंदिरातील स्वयंभु दत्तात्रेय मीच आहे. काळाग्नी स्वरुपात असलेले श्रीदत्तस्वरूप माझेच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतरलो आहे. मी माझ्यापुढील नृसिंह सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री बापन्नाचार्युलू सारखाच दिसेन. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्त भावाने “श्रीपाद वल्लभा, दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारताच मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करतो.” श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेलप्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले.

Leave a Reply