लेक माझी

अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
नाव सुद्धा माझं ती
इथेच ठेऊन जाते।।

 पहिला घास, देवा, ती
माझ्या कडून खाते
माझाच हात धरुन ती
पहिलं पाऊल टाकते।।

 माझ्याकडूनच ती
पहिलं अक्षर शिकते
तिच्यासाठी सुद्धा मी
रात्र रात्र जागतो।।

 कुशीत माझ्या झोपण्यासाठी
ती गाल फुगवुन बसते
मी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचते।।

 अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे हे
तिचे माझे नाते।।

 एक दिवस अचानक, ती,
मोठी होऊन जाते
बाबा , तूम्ही दमला का, ?
हळूच मला विचारते॥

 माझ्या साठी कपडे, चप्पल,
खाऊ घेऊन येते
नव्या जगातील नविन गोष्टी
मलाच ती शिकवते।।

 तिच्या दूर जाण्याने
कातर मी होतो
हळूच हसून मला ती
कुशीत घेऊन बसते।।

कळत नाही मला, देवा,
असे कसे होते
कधी जागा बदलून ती
माझीच आई होते।।

 देव म्हणाला, ऐक, पोरी
तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची
एक कडी असते।।

 तुझ्या दारी फुलण्यासाठी
हे रोप दिले असते
सावली आणि सुगंधाशी तर
तुझेच नाते असते।।

 वाहत्या प्रवाहाला, कोणी,
मुठीत कधी, का, धरते ?
मार्ग आहे ज्याचा, त्याचा
पुढेच असते जायचे।।

 तुझ्या अंगणातली धारा ही
“जीवनदात्री” होते
आणि वाहती राहण्यासाठीच
“गंगा” ”सागराला” मिळते।

Leave a Reply