मोबाईल

मम्मी सोड मोबाईल
माझ्या सोबत बोल
थोडावेळ बागेमध्ये
खेळु आपण चल…!

सोबत तुला नेहमी
मोबाईल लागतो केवळ
घरी आल्यावर तरी
घे ना मला जवळ…!

रात्रभर मोबाईल
असतो तुझ्या उशाला
तरीसुद्धा दिवसभर
सोबत ठेवते कशाला…?

पप्पा आज मोबाईल
ऑफिसमध्ये विसरा
माझा चेहरा होईल
आनंदाने हसरा…!

दिवसभर मोबाईल
तुम्ही हातात धरता
माझे बोट धरून
सांगा कधी फिरता…?

पुढच्या जन्मी मला
मोबाईल व्हायच आहे
कारण मला दिवसभर
मम्मी आणि पप्पांसोबत
रहायचं आहे…!

Leave a Reply