नाही उमगत ” ती “

काहीच बोलता न येणारी बाळं
बोलायला शिकतात
बोलायला शिकवलेल्या आईला
कधी कधी खूप खूप बोलतात

मान्य आहे पहिला संघर्ष
आईशीच असतो
बोलताना , तिच्या भावनांचा अर्थ
समजून का घ्यायचा नसतो ?

नको म्हणा , रागवा , तिरस्कार करा
हवे तसे बोला , मस्करी करा
ती कायम तुमच्या पाठीशीच असते
कारण ती वेडी असते

नाही जेवला , अभ्यास नाही केला
लवकर नाही उठला , नाराज दिसला
सतत विचारपूस करत राहते
कारण ती वेडी असते

तुम्हाला रागावते पण तीच रडते
मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते
स्वतःला विसरते , तुमच्या विश्वात रमते
कारण ती वेडी असते

जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते
हरला तर खंबीर बनवते
तुम्ही असाल कसेही , जीवापाड जपते
कारण ती वेडी असते

ती नाही कळणार , नाही उमगणार
तीच्यामुळे आपण काहीसे घडलो
हे आज नाहीच आपल्याला पटणार
कारण ती वेडीच वाटणार

खरं तर ती वेडी नसतेच कधी
मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत
स्वतःला ही नव्यानं फुलवत असते
स्वप्नातील दिवस तुमचे
वास्तव स्वीकारुन बघत असते
कारण ती “आई “असते

ती उमगू लागते तेव्हा आपण
मागे जाऊ शकत नसतो…
ती असेपर्यंत थोडीशी समजली तरी
यासारखा खरा आनंद नसतो…

सर्व आईंना समर्पित

Leave a Reply