तिची काॅटनची साडी

तिची काॅटनची साडी
पांघरुण म्हणून फार आवडते,
तिच्या कानातील कुड्या
जपून ठेवायला मी धडपडते,
कोपर्यातील तिची काठी
सतत मला खुणावते,
तिच्या थरथरत्या मऊ हातांचा स्पर्श,
तिचे सुरकुत्या पडलेले दंड आणि गाल,
केस कमी असूनही आंबाडा घालायचा अट्टाहास,
ह्या सर्व आठवणी येतात आणि
क्षणात डोळे पाणावतात,
‘आजी’ परत नाही मिळणार,
हा विचार मन सुन्न करतात…
मग समोर आई दिसते,
तशीच…..आजीसारखी होत चाललेली,
अजूनही जवळ हवी अशी ती माऊली…
ती पण जेव्हा नसेल…….
ह्या विचाराने मन थरकापते…
पण कालचक्र थांबणार नाही,
उद्या तिच्या जागी मी असेन,
माझ्या कन्येच्याही मनात,
हाच विचार रुंजी घालत असेल……
माझ्या आईची काॅटनची साडी,
तेव्हा माझी लेक न्याहाळत असेल….

Leave a Reply