एका जंगलात एक कावळा रहात होता. आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता. आपण अत्यंत सुखी आहोत अस त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता. एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला,” मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो ” असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला,” खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे “.
मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला. एका पोपटाला गाठून त्याने सगळी कथा ऐकवली. तो पोपट हसत म्हणाला ,” माझा ही समज असाच होता,मी स्वतःला खरच सुखी समजत होतो पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं कि तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे पृथ्वीवर , कारण त्याच्या अंगावर अगणित रंग आहेत ”
हे ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला. आणि मोराच्या शोधात निघाला. एका प्राणी संग्रहालयात एका पिंजऱ्यात त्याला एक मोर दिसला. शेकडो लोकं त्याच्या भोवती गोळा होवून त्याचं गुणगान करत होते. आता कावळ्याला खात्री पटली कि हाच जगातला सर्वात सुखी पक्षी. काही वेळाने सर्व लोक निघून गेल्यावर हा त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि आत्तापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला,” मयुरराज, आपण खरच खूप सुंदर आहात, रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि तुमची स्तुती करतात , मला मात्र कुठं गेलं कि हुसकावून लावतात, आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावर !!
तो मोर खिन्नपणे हसत म्हणाला,” मला ही सगळ्यात सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता मित्रा पण माझ्या या सौंदर्यामुळे मी पिंजऱ्यात अडकलोय, सगळं प्राणी संग्रहालय फिरून बघ तुला इथे सगळे पक्षी दिसतील पिंजऱ्यात पण कावळा नाही दिसणार कुठे , आणि त्यामुळे मी सध्या असा निष्कर्ष काढतोय कि कावळा हा सर्वात सुखी पक्षी आहे कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही उडू शकतो आणि जावू शकतो ….!
तात्पर्य काय मित्रांनो ??
आपण नेहेमी समजत असतो कि आपले नातेवाईक , मित्र ,सहकारी , आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा, पण प्रत्यक्षात काही वेगळाच असतं. आपण आपल्या परिस्थितीची तुलना कारण नसताना दुसऱ्याशी करतो आणि दु:खी होतो. आपल्याला दिलेले गुण , आपली सुखं याचा विसर पडून दुसऱ्याचे गुण आणि सुख आपल्याला नाही म्हणून दु:खं करतो, त्याच्या आयुष्यातही काही दु:खं असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही आणि एकांगी विचाराने अजून आपलं आयुष्य नीरस करत जातो.
आजकाल आपल्या स्वत;च्या दु:खापेक्षा दुसर्याच्या सुखाने माणसं जास्त दु:खी व्हायला लागलीत. “भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?” ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे.
प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दु:खं आहे आणि सुख ही आहे , त्यांच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत
” जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तूच शोधोनी पाहे …!!!”
सुखी आणि आनंदी जीवनासाठी सर्वांना शुभेच्छा !!!.
2017-03-10