चिठ्ठी

तो फक्त बोलायचा
ती फक्त ऐकायची
एक खेळ सुरू होता
बोलण्या-ऐकण्याचा

खेळात होत्या दोन चिठ्या
एकात लिहीले होते ‘बोला’
एकात लिहीले होते ‘ऐका’

आता हे प्राक्तन होते
की फक्त योगायोग?
तिच्या हाती यायची तीच चिठ्ठी
ज्यावर लिहीले होते ‘ऐका’

ती ऐकत राहीली
कोणाचे तरी हुकूम,
कोणाचे तरी उपदेश.

बंधने तिच्यासाठी होती
तिलाच होते सर्व नकार
तिला हेही माहीत होते
‘ऐकणे आणि बोलणे’
या नाहीत फक्त क्रिया.

राजा म्हणाला, ‘विष पी’
ती मीरा झाली.

ऋषि म्हणाले, ‘शिळा हो’
ती अहिल्या बनली.

प्रभू म्हणाले, ‘चालती हो’
ती सीता झाली.

चितेतून आली किंकाळी
अनेक कानांनी ऐकली नाही
ती सती बनली.

दबले तिचे गा-हाणे
अडकले तिचे शब्द,
शिवलेले गेले ओठ..
दाटून आलेला गळा..

तिच्या हाती मात्र कधीच
नाही लागली ती चिठ्ठी
ज्यावर लिहीले होते ‘बोला’.

Leave a Reply