क्या भात है !!

सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला घेतलेली आहे.
विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा थोडी जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच चिंतेची आहे.

भा र त ह्या शब्दाची व्युपत्तीच मुळात ‘भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश‘ अशी व्हायला हवी. ज्या देशाच्या नावातच भात आहे अशा लोकांनी भात सोडणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल.

भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण भात जेवून आपलं.

मी एक भारतीय आहे.
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि देशातल्या विविधतेने नटलेल्या भाताच्या परंपरांचा मला अभिमान आहे.
उत्तर टोकाला काश्मीरी पुलावापासून ते तामिळ रस्सम भातापर्यंत, द्वारकेच्या गुज्जू कढी खिचडीपासून ते ओरिसा, बंगालच्या माछभातापर्यंत, महाराष्ट्रातल्या केशरी भातापासून ते हैदराबादेलतल्या बिर्याणीपर्यंत, कर्नाटकातल्या भिसीब्याळी अन्नमपासून ते लखनवी बिर्याणीपर्यंत भाताच्या सर्व परंपरांची मला आवड आणि अभिमानही आहे.

भारतात शेतीचं युग आल्यावर आद्य पिकांमध्ये असलेलं धान्य तांदूळ असेल.
अनेक वर्षं चुलीवर असलेला भात गॅसवर आला आणि पेज हा पदार्थ गायब व्हायला सुरुवात झाली.
कुकर ह्या प्रकाराने भात शिजवण्याची प्रोसेस टी ट्वेंटीसारखी करून ठेवली. मॅच चालू होऊन कधी संपते हे कळतही नाही. एरव्ही सोय म्हणून मान्य आहे पण निवांत असू तेव्हा गॅसवर खरी ‘कसोटी’ लागायला हवी. अस्सल भाताची मजा त्यात आहे. खरंतर तांदूळ शिजवायला ठेवून त्याचा सुगंध हळूहळू स्वयंपाकघरात पसरायला हवा. पण कुकर फिल्डिंगला येतो आणि त्याला सुगंधाचा कॅच काही पकडता येत नाही. तो कायम ड्रॉपच होतो.

भाताची एक गम्मत आहे. भात हा एकटा कधीच नांदत नाही. तो जेव्हा एकटाच असतो तेव्हा त्याचं रुक्ष पिंड होतं. पण त्याच्या मुदीला गोडंवरणाची, लिंबाच्या फोडीची, तुपाच्या धारेची साथ मिळाली आणि एखाद तुळशीपत्राचं टॉपिंग मिळालं की त्याचा नैवेद्य होतो. रिष्ता वही होता है पण सोच नई हो जाती है.

गोडंवरण भात म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा सिनेमा असेल तर बिर्याणी ही वेबसिरीज आहे. रसिक माणूस दोन्ही गोष्टी एकत्र एन्जॉय करत असतो. जो एकवरच अडून राहतो त्याचं आयुष्य अगदीच निरस आणि एकसुरी ठरतं.

वरण, आमटी, रस्सा, रस्सम, कालवण, सांबार हे भाताचे शाश्वत सोबती आहेत. त्यांनी भाताची साथ शेवटपर्यंत देणं अपेक्षित आहे. डाळीच्या प्रमाणासोबत त्या दोघांचं नातं घट्ट होत जातं. कधीकधी आमटीची माया पातळ होते आणि भाताच्या उदार फटींमधून द्रव पदार्थ पसार होतो. सुखाच्या आठवणींसारखी डाळच शिल्लक राहते. अशावेळी त्यांचा संसार अर्ध्यावरती मोडल्याचा भास होतो.

चिंचं, गूळ, आमसूल, कढिलिंबं, मिरच्या, कैरी, शेगटाच्या शेंगा, क्वचित वांगी, टोमॅटो खरे टेस्टमेकर्स आहेत. त्यांच्यामुळे गेमला एलिगन्स आहे. ही व्यंजनं ज्याला आवडत नाहीत, त्याचं आयुष्य फोल आहे.
जीरा राईसमधलं तडतडलेलं जिरं, दही बुत्तीमधली उडदाची डाळ, पुलावातलं तमालपत्र, कढी खिचडीमधली लवंग, काश्मिरी पुलावामधले काजू इत्यादी इत्यादी जेवणाच्या कहानीमधले ट्विस्टस आहेत, ते शोधून ज्याला एन्जॉय करता आले त्याचं खाद्यजीवन आनंदी ठरतं.

आमटी आणि भाताचा संसार मला उमा महेश्वरांच्या संसारसारखा वाटतो.
जेवणाने कितीही वेगवेगळे अवतार घेतले तरी सरतेशेवटी संध्याकाळी भात आमटीबरोबर पानात समोर आला की पोटात शांतता नांदते.
मऊ भात हा आजकालच्या कॉमेंटेटर्ससारखा आहे. थोडा ओव्हररेटेड. बरं इंग्लिश हे मेतकूट आहे. ते असलं की वेळ मारून नेली जाते. बाकी परफॉर्मन्स फक्त वेळ मारून नेण्याइतकाच.
खरपुडी म्हणजे कव्हर ड्राइव्ह. सायीच्या दुधाची हाफ व्हॉली मिळाली की बौन्ड्री नक्की असते.
फोडणीचा भात हा नाईट वॉचमन असतो. आदल्या रात्रीचा त्याचा गेम दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सेशनपर्यंत आरामात चालतो. शेंगदाणे आणि सांडगी मिरची हे दोघे नॉन स्ट्रायकिंग एन्डला असले की, फोडणीच्या भाताचा गेम विशेष बहरतो वगैरे.
खिचडीची तुलना केवळ राहुल द्रविडशीच होऊ शकते. जो रोल दिया है उसको निभानेका फर्ज वो बोहोत इद्दत के साथ निभाती है. पोट व पिच बिघडलंय आणि विकेट पडताहेत अश्या सिच्युएशनमध्ये पिचवर उभं राहायला हवंय, कंटाळा आलाय आणि तरीही एक बाजू सांभाळायची आहे, अचानक घरी कोणीतरी आलंय आणि आस्कींग रेट वाढला आहे, किंवा अगदी हौस म्हणून साग्रसंगीत टेक्निकल आणि निवांत बॅटिंग करायची आहे- अश्या सगळ्याला पर्याय फक्त राहुल द्रविड आणि खिचडी हाच असू शकतो. साथीला भाजलेला पोह्याचा पापड, सांडगी मिरची, एखादी कोशिंबीर असली तर नुसती इनिंग सांभाळली जात नाही तर फॉलोऑन मिळालेली अख्खी मॅच जिंकली जाऊ शकते.

रात्रीच्या जेवणात भातापेक्षा सूप सलाड घेणाऱ्या लोकांचं मला कौतुक वाटतं.
(सूप आणि सलाड लोकं रात्रीच्या जेवणात ‘घेतात’. आम्ही मात्र भात ‘जेवतो’).
आपल्या बॉलिंग लायनपमध्ये बुमराह, भुवनेश्वर, असताना एखाद्या गल्लीतल्या बॉलरला बॉलिंग द्यावी असा तो प्रकार वाटतो.

एकंदरीतच आमटी भाताचं पोटभर जेवण म्हणजे यज्ञकर्म असतं.
दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ ही अध्यात्माची पहिली पायरी असली तर कोन नाय कोनचा, डाळ भात लोनचा, हे जीवनाचं गुह्यतम ज्ञान आहे.
क्षोत्रं चक्षु: स्पर्शनंच रसनं घ्राणमएवच ह्या सर्वांना सोबत घेऊन जो हे ज्ञान प्राप्त करतो त्याला संसारात काहीच कमी राहत नाही.

Leave a Reply