एक रूम आई साठी

साहेब ! कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली. कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले. बघतो. म्हणून कुरिअर उघडले. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पानी एक पत्र. 
अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा ? आणि पत्र कोणाचे आहे ?

मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले. अगं ! आईचे पत्र आहे. मग वाच ना ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वाच पत्र. 

मी पत्र वाचायला सुरुवात केली. 

प्रिय अजित, 

अजूनही तू मला प्रिय आहेस, म्हणून प्रिय लिहिले आहे.

तुझा व्हॅट्स ऍप वर मातृदिना प्रित्यर्थ पाठविलेला संदेश मिळाला. 

अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे, हे समजून बरे वाटले. नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान.

फेसबुक वर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले. 100 च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या. पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. न जाणो नावातील साधर्म्य पाहून, कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर, तू उगाच कानकोंडा होणार, म्हणून टाळले.

पण बेटा ! हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते. असो ! प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे. कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील, तुझा व सुनेचा फोटो पण पहिला. खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू. सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून. बंगला पण छान बांधला आहेस.

कोणा त्रयस्थ  वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले. लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली. त्यावेळी खरंच वाटले नव्हते, कि तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू. सर्वजण म्हणायचे, माई ! तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय, मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही. सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही.

तुला खूप शिकविले, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरविला. तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास. परदेशात जाऊन आलास, गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली. तुला आवडलेल्या मुलीशी, लग्न लावून दिले. सोन्या सारखी दोन नातवंडे मिळाली. तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून, आनंदाने डोळे मिटणार होते. पण ! अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली.

परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस, परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास. पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते. परदेशातून परत आलेला मला, आमच्या संस्थापक बाई कडून समजले. आणि तू दिलेला 10 लाखाचा चेक पण समजला. चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा !  पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटस ची होती.

मग मी सुद्धा, आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली. 

एक सांगू राजा! तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस. तुझ्या कडे राहिले असते, तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्या पुरते मर्यादित राहिले असते. इथे मला खुप समवयस्कर, समदुःखी मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत. मी आता एकदम मजेत आहे. तुझ्या 10 लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे. मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही. अधून मधून बंटी-बबली आठवतात. आता मोठे झाले असतील ना रे!  आजीला ओळखणार पण नाहीत. आणि तुही ओळख सांगू नकोस. सुनबाई नोकरी करते का रे अजून. हं ! आता विचारून काय उपयोग म्हणा, आपली आता भेट होणे नाही. हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन.  तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे.

अरे ! आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे ! आम्हाला माया हवी असते. ज्या मुलांना आपण वाढविले, त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाल-लीला पाहत, सुनेचे कोड-कौतुक करत, आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची ईच्छा असते. पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार. अरे ! केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका. आपल्या साठी पैसा हवा, पैश्या साठी आपण नको. 

आता वाटते की, माझेच संस्कार कुठे तरी कमी पडले, नाहीतर मुले हि मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेतात. त्यामुळे मी तुला किंवा सूनबाईला दोष देत नाही. तुम्ही सर्वजण सुखात रहा हीच अंतिम इच्छा. फक्त एकच प्रश्न विचारते, बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच. 

नोकर माणसां साठी आणि कुत्र्यां साठी रूम बांधल्यास तुझ्या   बंगल्यात, तशीच एक रूम आई साठी बांधता आली नाही का रे तुला ???
एका मुलाने टाकलेली आई 

उर्फ  माई

Leave a Reply