आजी आजोबा

परस्परांकडुन अपेक्षांचे ओझे नसलेले एकमेव नाते म्हणजे आजी-आजोबा आणि नातवंड. बोनस म्हणून पदरात पडलेल्या या अनोख्या व निर्व्याज प्रेमाच्या नात्यासंबंधी सर्व भाषांच्या साहित्यात उल्लेख आढळतो व रुढ परंपरेनुसार गंभीर, करारी ठरवलेल्या आजोबांपेक्षा आजीची बाजु काकणभर सरस दाखवली जाते.. अर्थात अशा दुय्यम स्थानाची आजोबांना आजीचा नवरा झाल्यापासुनच सवय झालेली असते…!

आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा हा कोवळा जीव हातात येतो तेव्हा आजी आजोबांचा आनंद गगनात मावत नाही.. असं म्हणतात की आजीपण हे लांबविलेले आईपण असते.. फरक इतकाच की स्वतःच्या अस्तित्वाचीच निश्चिती नसल्याने ती कोणत्याही अपेक्षा त्या जीवावर लादत नाही.. आजीच्या प्रेमाला दुधाच्या सायीची उपमा जरी दिली जात असली तिला त्यापासून लोणी आणि तुपाची अपेक्षा नसते.. तिचं धेय्य फक्त साय जपणं एवढंच असतं…!

अपेक्षाविरहीत अशा ह्या नात्यात फक्त जाज्वल्य प्रेमाची लयलुट होत असते.. हवे हवेसे रुसवे फुगवे, वार्धक्याचं भान न ठेवता लुटुपुटुच्या लढाईत शारीरिक दमणुक ओढवुन घेणं आणि बोबड्या बोलांतुन.. सांकेतिक भाषेतुन क्लिष्ट संकेतांचा योग्य अर्थ लावणे हे सर्व काही लिलया जमु लागतं.. नातवंडाच्या तासनतास चालणाऱ्या जेवणावळीतील प्रत्येक घासासाठी आजीची वणवण तिला जाणवतही नाही…! नातवंडाना पाठीवर घेउन घरभर फिरताना आजोबांना दुखऱ्या गुडघ्यांचा विसर पडतो तर लपंडावात कायम आजीवरच राज्य आणि आधिच ठरवलेल्या नेहमीच्या लपायच्या जागेतुन नातवंड प्रगट होताच तिला आश्चर्यही दाखवावंच लागतं.. नाहीतर तो रडीचा डाव ठरतो.. ! दोन जिने चढल्यावर लागणारी धाप विसरुन नातवंडामागे पळावंच लागतं आणि प्रत्येक शर्यतीत हरावंच लागतं.. तरच जिंकल्याच समाधान मिळतं…! आजीचं हे हरणंच तिचं जिंकणं असतं..!

सारांश… आजी आजोबा हे शब्दातीत असुन त्यातील सुख आणि आनंद ते होण्यातंच असतो. नातवंडांसाठी आजी आजोबा हवेतंच…!

Leave a Reply