‘अहंकाराच्या’ धुंदीत ‘जगण्याच्या’ वाटेवरुन चालताना ‘सुखदुःखाचे’ घाट उतरून मी जेव्हां ‘सन्मार्गावरुन’ आलो
तेव्हा ‘ग्रंथांच्या’ झाड़ातुन वाळलेल्या रसांचे दोन ओघळ पाहिले मी,
शेवटी पाने म्हणाली ‘शांतिरस’ आणि ‘भक्तिरसाचे’ आहेत ते म्हणून ‘स्वानुभवाच्या’ चौकात उभ्या असलेल्या ‘सिद्धाला’ मी विचारलं हा ‘शांतिरस’ कुठे मिळतो हो? तेव्हा तो म्हणाला
समोर ‘संयमाच्या’ मार्गावरुन जाताना तुला ‘प्रलोभनांची’ दुकाने लागतील पुढे ‘मायेचे’ सर्कल लागेल,
तिथेच ‘मूर्खांचा’ बाजार म्हणून एक मोठा मॉल आहे त्याच्या आधी ‘शहाणपणाची’ एक गल्ली लागते ती ओलांडून जा,
पुढे ‘वैराग्याचा’ आडवा रस्ता लागेल तो ही क्रॉस कर.
डाव्या हाताला ‘ज्ञानाचे मंदिर’ लागेल समोरच ‘अध्यात्माचे कॉम्पलेक्स’ आहे.
ठेकेदारांचे वॉचमन तुला अड़वतील “नामाचा पास” दाखवून आत जा,
समोरच तुला चार बिल्डिंग दिसतील.
‘वैखरी’, ‘मध्यमा’, ‘पश्यन्ति’, ‘परा’
त्यातल्या ‘परा’ बिल्डिंग मध्ये ‘तिस-या’ मजल्यावर ‘स्वानंदाचा’ फ्लॅट आहे.
‘शरणागतीची’ बेल वाजव
‘कृपेचे’ दार उघडले जाईल समोर ‘ध्यानाचा’ कोच असेल त्यावर जरा निवांत बैस ‘मुक्ती’ उभी असेल ‘समाधानाच्या’ ट्रे मधे ‘शांतिरसाचा’ कुंभ घेऊन…